इंचार्जसह 4 डॉक्टरांना कोरोना स व्हेंटिलेटरवर असतानाही कारभार
महिनाभरापूर्वी कोरोना रुग्णाच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चेत आलेले मेल्ट्रॉन कोविड सेंटर आता चक्क आजारीच पडले आहे. येथील कार्यरत 12 डॉक्टरांच्या टीमपैकी तब्बल चार जणांना कोरोनाची लागण झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. इन्चार्ज व्हेंटिलेटरवर असून तेथूनच त्या सेंटरचा कारभार हाकत आहेत. या कोविड सेंटरमध्ये सेवा देण्याला आता डॉक्टरच नकार देत असल्याचेही समजते.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून चिकलठाण्यातील मेल्ट्रॉन कंपनीमध्ये भव्य कोविड सेंटर उभारण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन झाले. त्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनी 22 जून रोजी हे सेंटर कार्यरत झाले आहे. 256 खाटांच्या या सेंटर मध्ये 140 कोरोना पेशंट उपचार घेत आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी जवळपास पंधरा डॉक्टरांची टीम येथे कार्यरत आहे. त्याचबरोबर परिचारिका यासह शिपाई असा जवळपास 60-70 आरोग्य कर्मचार्यांचा स्टाफ येथे कार्यरत असतो.
इन्चार्ज सह चार डॉक्टर पॉझिटिव्ह !
अवघ्या दोनच महिन्यात मेल्ट्रोन कोविड सेंटर असुविधांचे माहेरघर बनले आहे. संसर्गापासून बचाव करण्याच्या उपाय योजना येथे तोडक्या पडत असल्याने आता डॉक्टरांनाच संसर्गाची लागण होत आहे. येथील इन्चार्ज कोरना ग्रस्त झाले असून खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते. दुसरीकडे चार डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सेंटरमध्ये फैलावलेला संसर्गा पाहता आता इतर डॉक्टर्स असुरक्षित असल्याचे बोलले जाते.
सुटी नाही...
दरम्यान, येथील एका डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, शासनाच्या नवीन नियमानुसार पाच दिवस ड्यूटी अन दोन दिवस सुट्टी द्यायला हवी होती. मात्र येथील डॉक्टरसह परिचारिका व इतर स्टाफला बारा तासांची ड्यूटी दिल्या जाते. सलग बारा तास डॉक्टर कसे काम करू शकेल? त्यांना आराम करण्यासाठी वेगळ्या रूमची व्यवस्थाही याठिकाणी नाही. डॉक्टरांना सुटीही दिली जात नाही. त्यामुळे अनेक डॉक्टर्स राजीनामा देण्याच्या निर्णयावर आले आहेत.
कायमच चर्चेत!
दरम्यान उद्घाटनापासूनच हे कोविड सेंटर टीकेचे धनी बनले आहे. गेल्याच महिन्यात सेंटरमधील कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला नृत्य करावयास लावल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेत मनपा आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा एकदा हे सेंटर चर्चेत आले आहे. महानगरपालिकेने या सेंटरसाठी नव्याने डॉक्टरांची भरती केली होती. मात्र सुविधा मिळत नसल्याने अनेक डॉक्टरांनी सेवा देण्यास नकार दिला. सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टरांना दररोज 12 तासांची ड्युटी दिली जाते. अत्यंत जोखमीच्या ठिकाणी काम करतांना कोणतीही काळजी घेतली जात नसल्याची तक्रार थेट मनपा आयुक्तांकडे केली होती.
परजिल्ह्यातील डॉक्टरांना धक्का!
संसर्गाच्या काळात महानगरपालिकेने जाहिरात देऊन नव्या डॉक्टरांची भरती केली. करार तत्वावर भरलेले हे डॉक्टर लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यातून सेवा देण्यासाठी येथे आले आहेत. या तरुण डॉक्टरांना आता कोरोनाने घेरले आहे. कुटुंब परजिल्ह्यात तर डॉक्टर इकडे! अशा परिस्थितीत त्यांच्याकडे लक्ष द्यायलाही कुणी नाही. आई-वडिलांना सांगणार तरी कसे ? त्यांचे काय हाल होतील, अशी भीती एका डॉक्टरने सांजवार्ता प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
शहरात महानगरपालिकेचे जवळपास 40 कोविड सेंटर आहेत. सुदैवाने रुग्ण सेवेतील डॉक्टर्स परिचारिका आदींना अद्याप संसर्गाची लागण झालेली नाही. मेल्ट्रॉन कोविड सेंटर मधील इंचार्ज सह चार डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू आहेत.
-नीता पाडळकर,
आरोग्य अधिकारी मनपा